शिवाजी सावंत/ रमेश वारके ।गारगोटी : १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण भारतात पोलीस गोळीबाराच्या ज्या प्रमुख पाच मोठ्या घटना घडल्या, त्या घटनेमध्ये समाविष्ट असलेली एक घटना म्हणजे गारगोटी कचेरीवर लढा देत असताना १३ डिसेंबर १९४२ रोजी पोलिसांच्या गोळीबारात देश स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सात क्रांतिवीरांच्या बलिदानाची घटना होय. आज या लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. सात हुतात्म्यांच्या बलिदानाने अजरामर झालेला हा गारगोटी लढा ७५ वर्षांनंतरही दुर्लक्षितच आहे.
या लढ्याची आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी, समाज वा पाठ्यपुस्तक मंडळाने म्हणावी तशी दखल घेतली नाही. हा लढा शासनाने प्रेरणोत्सव दिन म्हणून साजरा करण्याची गरज आहे. ८ आॅगष्ट १९४२ रोजी म. गांधीजींनी ‘चले जाव’ची घोषणा केली होती. सारा देश त्यावेळी चळवळीने भडकला. कोल्हापूर संस्थांनातही याचे लोण पसरले. ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला. गारगोटी खजिना लूटप्रसंगी गारगोटी कचेरीवर १३ डिसेंबर १९४२ रोजी ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात क्रांतिकारक शहीद झाले.
या लढ्याला उजाळा देण्यासाठी व हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होण्याची मागणी होत आहे. या लढ्यात सेनापती कापशीचे करवीरय्या स्वामी, शंकरराव इंगळे, मुरगूडचे तुकाराम भारमल, नानीबाई चिखलीचे मल्लू चौगले, कलनाकवाडीचे नारायण वारके, खडकलाटचे परशुराम साळोखे, जत्राटचे बळवंत जबडे हे सात क्रांतिकारक शहीद झाले. त्यांच्या या शौर्याची गाथा ७५ वर्षांनंतरही विस्मृतीत जाऊ लागली आहे.
गारगोटी कचेरीवर हल्ला करून कचेरीत कैद असलेल्या राजबंद्यांना सोडवायचे, ब्रिटिशांनी शेतसारा व गावदंडाची वसूल केलेली रक्कम जेथे ठेवली होती तिलाच खजिना असे म्हटले जात होते तो खजिना व पोलिसांच्या बंदुका हस्तगत करायच्या, अशा प्रकारची ही मोहीम होती. १२ डिसेंबरच्या रात्री पालीच्या गुहेत ठरल्याप्रमाणे ९० क्रांतिकारकांनी रात्री दोन वाजता कचेरीला वेढा दिला. कचेरीत घुसत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांची व स्वामींची झटापट झाली आणि या झटापटीतच पोलिसाच्या बंदुकीची गोळी स्वामींच्या छातीत घुसली आणि १३ डिसेंबरच्या गारगोटी लढ्यातील पहिला क्रांतिकारक देशस्वातंत्र्यासाठी शहीद झाला. त्यानंतर आणखी सहा क्रांतिकारक पोलिसी गोळीबारात शहीद झाले.
शेवटी या सात क्रांतिकारकांचे मृतदेह कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर ब्रिटिशांनी बेवारस म्हणून दहन केले. देशासाठी प्राण अर्पण करणाºया या सात हुतात्म्यांची किती ही हेळसांड आणि अनास्था? ब्रिटिशांनी १३ डिसेंबरच्या या हल्ल्यात बळी पडलेल्या क्रांतिवरीांना बेवारस तर ठरविलेच, परंतु स्वातंत्र्यानंतरही या हुतात्म्यांचा क्रांती इतिहास अज्ञातच राहिला हे किती मोठे दुर्दैव म्हणावे लागेल! हा रोमांचकारी इतिहास भावी पिढीला समजला तर त्यांचा ऊरही स्वाभिमानाने भरून येईल. यासाठी गरज आहे ती शासनस्तरावर प्रयत्न होण्याची.
गारगोटी कचेरीवर हल्ला ही घटना देशात घडलेल्या प्रमूख पाच घटनेपैकी एक आहे. या घटनेमध्ये सात क्रांतिकारकांना हौतात्म्य पत्करावे लागले, परंतु या घटनेची दखल म्हणावी तशी आजपर्यंत घेतलेली नाही. हा इतिहास जर लोकांसमोर आला असता तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्या प्रमाणे प्रचलित झाला असता. मात्र, तसे घडले नाही. १३ डिसेंबर हा दिवस प्रेरणोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे.- एम. डी. रावण (मुरगूड),क्रांती लढ्याचे अभ्यासक.